तुम्ही स्टार्ट-अप (Start-Up), बिझनेसच्या जगातला अनेक कथा वाचल्या असतील; पण, आज आम्ही तुमच्यासाठी अशा व्यवसायाची गोष्ट घेऊन आलो आहोत, जामध्ये आग्र्यातील दोघा भावांनी मिळून मशरूम शेतीच्या मदतीने कंपनी उभारली आहे. आयुष आणि ऋषभ गुप्ता या तरुण भावंडांनी काही वर्षांपूर्वी एकत्र येऊन सुरू केलेला हा व्यवसाय आज काही कोटींचा झाला आहे. त्यांच्या A3R मशरूम फार्म आणि गुप्ता ऑरगॅनिक फार्मची वार्षिक उलाढाल साडेसात कोटींवर पोहोचली आहे.
कोव्हिड महामारीने जगभर सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असताना आग्रा येथील आयुष (वय 25) आणि ऋषभ गुप्ता (वय 27) यांनी परदेशातून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी A3R मशरूम फार्म आणि गुप्ता ऑरगॅनिक फार्म सुरू केले. आता त्यांचा व्यवसाय जोर धरू लागला आहे.
मशरूम शेतीच्या निर्णयात वडील ठामपणे पाठीशी उभे राहिले
आयुष सांगतो की, शेतकरी होण्याच्या त्यांच्या निर्णयाला कुटुंबियांनी आजिबात पसंती दिली नाही. आमच्या शिक्षणासाठी कितीतरी पैसा लावला, आम्हाला विनाकारण परदेशात पाठवले, असे सारे वडिलांना सांगण्यात आले. मात्र, वडील भक्कमपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी सांगितले की, तुम्हाला कोणाचेही काही ऐकण्याची गरज नाही. जर तुम्हाला शेती योग्य वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहून ठरल्याप्रमाणे काम पुढे चालू ठेवले पाहिजे. नंतर आई-वडिलांच्या संमतीनेच दोघा भावांनी आग्रा येथे पॉलीहाऊस फार्म उभारण्याचे नक्की केले. त्या जवळील काही बचत गुंतवली आणि उर्वरित रक्कम कर्ज घेण्याचे ठरवले.