भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आता ‘गुगल’ने धाव घेतली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादकता वाढीसाठी मदत करणाऱ्या तंत्रज्ञानात ‘गुगल’ने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना वेळेवर कापूस पीक व्यवस्थापनाविषयी अचूक मार्गदर्शन मिळण्यात मदत होईल. पुढील टप्प्यात तांदूळ, गहू, मक्यासाठीही या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.
Googleने एका भारतीय कृषी AI स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘गुगल’ने आपल्या “गुगल ऑर्ग” या समाजसेवी शाखेमार्फत ही नवी गुंतवणूक केली आहे. वाधवानी AI कंपनीच्या कॉटन एस (CottonAce) या शेतकरी ॲपसाठी गुगलने हा आर्थिक पतपुरवठा केला आहे.
‘कॉटन एस’ ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
‘कॉटन एस’मध्ये गुगलकडून 33 लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजे तब्बल 27 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हे शेतकरी ॲप नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्याद्वारे शेतकर्यांना वेळेवर योग्य खते आणि कीटकनाशकांच्या वापरासह पीक लवचिकता तसेच कीड व्यवस्थापनाविषयी सल्ला दिला जाईल. त्यामुळे कापूस शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.