आंनदवार्ता
मान्सून चार दिवस आधी केरळात
मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबार बेटांवर आज पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.तर चार दिवस लवकर केरळात मान्सूनचे आगमन होणार आहे.भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे.मान्सून लवकर येणार ही उन्हाच्या काहीलीने त्रासलेल्या आणी खरीपाचे नियोजन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता आहे.
2008 नंतर म्हणजेच 18 वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे. 15 मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 31 मे आहे. परंतु यंदा 27 मे रोजीच म्हणजेच चार दिवस लवकर मान्सून पोहचणार आहे. गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागांत 6 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त106 टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.
मान्सून कधी कुठे पोहचणार?
5 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.
6 जून : महाराष्ट्र किनारपट्टी भाग, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.
10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार.
15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश.
20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली.
25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश.
30 जून : राजस्थान, नवी दिल्ली.