यावर्षी सतत ढगाळ वातावरण आणि संततधर पाऊस पडत असल्याकारणाने बऱ्याच ठिकाणी शेतांतील पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मातीमधील ओलावा वाजवीपेक्षा जास्त होऊन खेळत्या हवेचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी झाडास अपुरा प्राणवायूचा पुरवठा आणि जिवाणूंच्या व मुळांच्या श्वसन प्रक्रियेस अडथळा निर्माण झाल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग इत्यादी पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन पीक पिवळे पडत आहे तसेच मुळ्या सडत असल्याकारणाने पिकांची रोपे नष्ट होत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी करावयाचा उपायोजनाबाबत ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी खालील प्रमाणे सल्ला दिला आहे. जमिनीमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला चर तयार करावेत, पिक पिवळसर दिसत असल्यास पानांद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी १३:४०:१३ हे फॉलियर ग्रेड विद्राव्य खत ५ ग्रॅम अधिक मॅग्नेशियम सल्फेट दोन ग्रॅम अधिक महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये अळीवर्गीय किडींचा व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३% अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी पूर्वमिश्रित कीटकनाशक ८० मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एससी ६० मिली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% एससी १०० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९% ईसी १०० मिली किंवा आयसोसायक्लोसिरम ९.२% डीसी १२० मिली किंवा फ़्ल्युबेन्डामाईड २०% डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५% एससी ६० मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १५.८% ईसी १२० मिली किंवा प्रोफेनोफॉस ५०% ईसी ४०० मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी. तुर पिकाची समाधानकारक वाढ झाली असल्यास शेंडे खुडणी करावी व कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आकस्मिक मर निदर्शनास येत असेल तर तात्काळ २०० ग्रॅम युरिया अधिक १०० ग्रॅम पोटॅश अधिक २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली याप्रमाणे आळवणी करावी. वेगवेगळ्या कीडनाशकांची मिश्रणे एकत्र करू नये, कीटकनाशकासोबत विद्रव्य खते, संप्रेरके इत्यादी मिसळू नये. फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५-७ असावा. कीटकनाशकाच्या डब्यावरील सूचना वाचून त्याचे पालन करावे व फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा असा सल्ला ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी दिला आहे.