ग्रेन ड्रायर म्हणजे काय आणि शेतकरी सर्वात स्वस्त किंमतीला कोणते ग्रेन ड्रायर खरेदी करू शकतात, ते आपण जाणून घेऊया. ग्रेन ड्रायर म्हणजे धान्य सुकविण्याचे किंवा वाळविण्याचे यंत्र. हे ड्रायर मका, गहू, तांदूळ आणि इतर यांसारख्या कापणी केलेल्या धान्यांचा ओलावा कमी करण्यासाठी शेतीमध्ये वापरले जाणारे यंत्र आहे.
कापणीनंतर, धान्यांमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर आर्द्रता असते, ज्यामुळे साठवण दरम्यान धान्य खराब होऊ शकते. त्यासाठी धान्यातील ओलावा झटपट शोषून घेणारे ग्रेन ड्रायर अतिशय उपयुक्त ठरते. अर्थात, किंमती तुलनेने जास्त असल्याने हे यंत्र आजवर सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या आवाक्यापलीकडे होते.
बिहार कृषी विद्यापीठाकडून स्वस्तातील यंत्र विकसित
देशातील मका उत्पादक राज्ये आणि तेथील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सामान्य शेतकर्यांसाठी स्वस्तातील ग्रेन ड्रायर यंत्र विकसित केले आहे. साठवणुकीसाठी मका अनेकदा रस्त्यावर वाळवला जातो. यासाठी अनेक दिवस लागतात आणि मक्याचा दर्जाही कमी होतो. एवढेच नाही तर मक्यातील पोषक घटकही कमी होतात. शेतकर्यांची ही अडचण पाहून बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सामान्य शेतकर्यांसाठी हे लहान प्रमाणावरील मका सुकवण्याचे यंत्र विकसित केले आहे.